नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात कोरोनाचा फैलाव वाढतच आहे. या परिस्थितीबद्दल आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातल्या ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. ही बैठक २३ सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब यासह इतर काही राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.
राज्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या जास्त असतानाच शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. शनिवारी दिवसभरात २३ हजार ५०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर २१ हजार ९०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. २४ तासांमध्ये ४२५ जणांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्या रुग्णांच प्रमाण हे ७२ टक्के एवढ झाल आहे. तर मृत्यूचं प्रमाण हे 2.71 टक्के एवढ आहे.
देशातली कोरोनाची स्थिती, वाढत असलेली रुग्णांची संख्या, सगळे व्यवहार सुरू करण्यासाठीचा लोकांचा दबाव आणि पुढील उपाययोजना यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.