दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल चार वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला; मात्र प्रत्येक वेळी त्यामध्ये ब्रिटिश राजवटीचे एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या दोन लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असे म्हटले जाते; पण आता भारतीय नौदलाच्या नवा ध्वजावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द केली. मोदींनी विमानवाहू नौका तयार करणाऱ्या अभियंत्यांचे कौतुक केले आणि म्हणाले, या जहाजात जितक्या केबल्स आणि वायर्स आहेत. त्या कोचीपासून काशीपर्यंत पोहोचू शकतात. आयएनएस विक्रांत ही केवळ वॉरशिप जहाज नसून समुद्रात तरंगणारे शहर आहे.

मोदी म्हणाले, भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. हे भारताच्या प्रतिभेचे उदाहरण आहे. हे सशक्त भारताचे शक्तिशाली चित्र आहे. हे अमृत महोत्सवाचे अतुलनीय अमृत आहे. हे दाखवून देते की, जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा निश्चय केला तर काहीही अशक्य नाही. आज आपण एका नव्या सूर्याचा उदय पाहत आहोत. यातून निर्माण होणाऱ्या विजेने 5 हजार घरे उजळून निघू शकतात. ही युद्धनौका दोन फुटबॉल मैदानांएवढी आहे. यातील केबल्स आणि वायर्स कोचीपासून काशीपर्यंत पोहोचू शकतात. ही जटिलता आपल्या अभियंत्यांच्या जीवनशक्तीचे उदाहरण देतात.

विशेष म्हणजे या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असून, त्याचप्रकारे अष्टकोनी पद्धतीचे नौदलाचे चिन्ह या ध्वजावर अंकित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचे देखील अनावरण करण्यात आले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन हा ध्वज तयार करण्यात आल्याचे सांगितले. नौदलाच्या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे, तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात अशोकस्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आला आहे. या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्याआतील किनार ही काहीशी बारीक आहे.