कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना वाशी नाका जवळील एका कुटुंबाला, ‘तुमच्या घरावर देवीचा कोप झाला आहे’, असे सांगून ६ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिनकर हरी सुर्यवंशी (वय ६५, रा. देवकर पाणंद, पेट्रोल पंपाजवळ जुना वाशी नाका) यांनी एजंट दीपक पांडुरंग पाटील (रा. भोसलेवाडी) याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्यात दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जुना वाशी नाका परिसरात राहणारे दिनकर सुर्यवंशी यांची भोसलेवाडी येथे राहणाऱ्या दीपक पाटील याच्याशी काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यावेळी दीपक पाटील याने, ‘तुमच्या घरावर कोणत्या तरी देवीचा कोप आहे, हा कोप दूर केला पाहिजे’, असे सांगून करणी काढण्यासाठी वेळोवेळी दिनकर सुर्यवंशी यांच्याकडून ६ लाख ६७ हजार रुपये घेतले होते. मात्र काही दिवसांतच दीपक पाटील यांनी आपली फसवणूक केल्याचे सुर्यवंशी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी दीपक पाटील याच्याकडे दिलेले पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र दीपक पाटील यांनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे सुर्यवंशी यांनी दीपक पाटील याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.