मुंबई (प्रतिनिधी) : संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी अखेर लस तयार झाली आहे. परदेशांसोबतच आता लवकरच महाराष्ट्र राज्यातही कोरोना लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवक, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर ५० वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना दिली जाणार आहे.

हे लसीकरण पूर्ण झाल्यावर सर्व ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. राज्यातील ११ कोटींपैकी ३ कोटी लोकांना लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. यादी तयार करुन मतदान बूथप्रमाणे लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर ३० मिनिटे तिथेच बसवले जाईल. केंद्राकडून आलेली लस वाशी येथील केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी १६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.