मुंबई (प्रतिनिधी) : जितेंद्र आव्हाड लढवय्ये नेते आहेत. त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले आहे. त्यानंतर समजले की त्यांच्या अटकेसाठी ‘वरुन’ दबाव आहे. वरुन दबाव आहे म्हणजे कुठून हे मला माहिती नाही. मी कुणावरही आरोप करत नाही. पोलिसांवर दबाव येतोय. यात त्या बिचाऱ्यांची काहीच चूक नाही. मी सत्तेत असो वा नसो मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळे पोलिसांना फोन येताहेत ही शक्यता नाकारता येत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेच नमूद केले.

व्हिव्हीयाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या वादावरुन झालेल्या मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. या अटकेच्या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात चाललंय काय याची मला गंमत वाटते. जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि जो आंदोलन करतो त्याला शिक्षा. ब्रिटिश राजवटीचे दिवस मला आठवतायेत, अशा शब्दात सुळे यांनी आव्हाडांना केलेल्या कारवाईवरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. एखाद्या सिनेमात शिवाजी महाराजांबाबत चुकीचे दाखवले गेले असेल, त्याबाबत आवाज उठवल्याने अटक होत असेल तर आम्हा सर्वांना जेलमध्ये जावे लागले तरी चालेल; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले.