नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) एमएसपी हमी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमधील चर्चेची तिसरी फेरी सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हरियाणा आणि पंजाब सीमेवर सध्या शेतकरी शांत राहणार आहेत. असे असूनही, पोलिसांनी टिकरी सीमा आणि हरियाणातील बहादूरगड येथील सेक्टर 9 वळणावर सुरक्षा अधिक मजबूत केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टिकरी सीमेवरील हरियाणा पोलिसांचा सुरक्षा घेरा आता 6 ते 8 स्तरांवर वाढला आहे. पोलिसांची ही तयारी पाहता सरकारने शेतकऱ्यांशी समझोता न केल्यास आणि शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने मोर्चा वळवला तर शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत येऊ देणार नाही, अशी स्थिती असल्याचं जाणवत आहे. सध्या टिकरी सीमेवर वातावरण शांत आहे. मात्र, पोलिसांच्या सुरक्षा भिंतींमुळे रस्ते बंद असल्याने लोक त्रस्त आहेत.

11 स्तर सुरक्षा स्थापित

झज्जरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अर्पित जैन यांनी सांगितले की, पोलिसांनी टिकरी सीमेजवळील बहादूरगडच्या सेक्टर 9 च्या मोडवर लावलेली 11 थरांची सुरक्षा देखील वाढवली जाऊ शकते. ते म्हणाले की, सध्या जिल्ह्यात शांततेचे वातावरण असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. पोलीस सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून वातावरण शांततेत राहिल्यास आगामी काळात दिल्लीकडे जाणाऱ्या सीमेवर काही रस्ता खुला होऊ शकतो असे ही ते म्हणाले.