टोप (प्रतिनिधी) : शिरोली सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल करावा तरच महापुराच्या पाण्यापासून शिरोली, शिये, कसबा बावडा, भुते, निगवे, चिखली ही गावे वाचणार आहेत. महामार्गाची उंची वाढली तर ही गावे पाण्याखाली जातील त्यामुळे पिलरचा उड्डाणपूल उभा करावा अशी मागणी शिरोली व शिये ग्रामस्थांनी केली.

बास्केट ब्रिज, गांधीनगर फाटा येथील ब्रिज, पंचगंगा नदीवरील पुल याची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक वसंत पंदरकर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार राजूबाबा आवळे यांच्या सोबत केली.

यावेळी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी, संग्राम कदम,  सरदार मुल्ला, दीपक खवरे, ज्योतिराम पोर्लेकर, उत्तम पाटील, बाजीराव सातपुते, राहुल खवरे, यांनी सन ऑगस्ट २०१९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महापुर येऊन महामार्गावर आठ फूट पाणी आले होते. शिरोली, शिये, कसबा बावडा, भुये, निगवे ही गावे पाण्याखाली गेली होती. आता महामार्गावर भर टाकून उंची वाढवली तर गावे पाण्याखाली जाऊन बुडतील. त्यामुळे शिरोली सांगली फाटा ते पंचगंगा नदी पर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करावा अशी मागणी केली.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर विद्यार्थ्यांना जाण्यासाठी भुयारी मार्ग करावा अशी मागणी केली.

नागाव फाटा येथे मोठा उड्डाणपूल उभा करावा याठिकाणी मोठी शिरोली एमआयडीसी आहे.मोठा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे.नागाव फाटा येथे सर्वात जास्त अपघात होवून लोक व प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत.याठिकाणी मोठा उड्डाणपूल उभा करावा तसेच शिरोली एमआयडीसीत तिन लहान भुयारी मार्ग आहेत ते मोठे करावेत अशी मागणी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांनी केली.तर वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील यांनी गावची पाइपलाइन सेवा मार्गालगत आहे.ती खराब झाली तर ती पुन्हा घालून द्यावी अशी मागणी केली.

शिये फाटा येथे असलेला भुयारी मार्गाची रुंदी आणि उंची वाढवावी तसेच शिरोली सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलर चा उड्डाणपूल उभा करावा अशी मागणी सरपंच रेखा जाधव, उपसरपंच शिवाजी गाडवे, ग्रामपंचायत सदस्य तेजस्वीनी पाटील, पुनम सातपुते, शितल मगदुम, सर्जेराव काशीद, जयसिंग पाटील, विकास चौगुले, यांनी केली.

टोप येथे ४०० मिटरचा मोठा उड्डाणपूल होणार आहे. प्राथमिक शाळेपासून बिरदेव मंदिर पर्यंत हा पिलरचा उड्डाणपूल होणार आहे. असे प्रकल्प अधिकारी पंदरकर यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ प्रदीप पाटील, सरपंच रूपाली तावडे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

संभापुर येथे भुयारी मार्गाची मागणी संभापुर ग्रामपंचायतीच्यावतीने प्रकाश झिरंगे यांनी केली. तर आंबप फाटा येथे उड्डाणपूल उभा करावे, सेवा मार्ग करा, पोलीस चौकी करा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली.