इचलकरंजी (प्रतिनिधी) : ताराराणी पक्षाच्या माध्यमातून आमची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी राहिल. गतवेळीपेक्षा अधिकचे मताधिक्य इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून देण्यासाठी आम्ही झटू. निश्‍चिंत रहा विजय आपला आहे, असा विश्‍वास आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज (सोमवार) इचलकरंजीत ताराराणी पक्ष कार्यालयात येऊन आमदार प्रकाश आवाडे आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी, ताराराणी पक्षाच्या वतीने इचलकरंजी, शिरोळ आणि हातकणंगले या तीन मतदारसंघाबरोबर सर्वच ठिकाणी ताराराणीच्या कार्यकर्त्याची फौज आम्ही उभी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द आम्ही पाळण्यासाठी ही फौज तुमच्या पाठीशी उभी करु, असा विश्‍वास दिला.

तर खासदार धैर्यशील माने यांनी, आमदार आवाडे यांचे सहकार्याबद्दल आभार मानत महायुतीचा उमेदवार अधिक मतांनी कसा विजयी होईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन केले.

यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, नरसिंह पारीक, उर्मिला गायकवाड, सपना भिसे, प्रकाश पाटील, सर्जेराव पाटील, रवी लोहार, महेश ठोके, रवी रजपुते, संतोष शेळके, जीवन बरगे, श्रीरंग खवरे, एम. के. कांबळे, अविनाश कांबळे, शैलेश गोरे, सुभाष जाधव, रमेश पाटील, बंडोपंत लाड, राजू देसाई आदींसह ताराराणीचे पदाधिकारी, आवाडे समर्थक उपस्थित होते.