कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना सुरू करा, ऑनलाईन नोंदणी बंद करुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना तत्काळ २५ हजारांची मदत जाहीर करा यासह विविध मागण्यांसाठी आज (सोमवार) रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील सहायक कामगार आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. सहायक कामगार आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात बांधकाम कामगारांना मेडिकल योजना चालू करा, ऑनलाईन नोंदणी बंद करा बांधकाम कामगारांना कोरणा मदत म्हणून २५ हजार रुपये तत्काळ मंजूर करावेत, कामगाराला दिवाळीला १०, ००० रु. बोनस मिळावा, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दहा लाख रुपये विमा संरक्षण मिळावे, पाच हजार रुपये अनुदानाची योजना पुरवठा सुरू करावी, घरकुल योजनेची अंमलबजावणी त्वरित करावी, कामगार आयुक्त कार्यालयाकडे लाखांचे पेंडिंग अर्ज निकाली काढावेत, ज्या कामगारांना दोन व तीन हजार रुपये मिळाले नाहीत त्यांना ते त्वरित मिळावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांचा शासनानं सकारात्मक विचार न केल्यास ९ नोव्हेंबरला मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा  देण्यात आला. या मोर्चात रिपब्लिकन पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुणवंत नागटिळे, शहराध्यक्ष प्रदीप मस्के,  अशोक कांबळे,  कृष्णात लोखंडे,  रवि पाटील, समीर कांबळे, अनिल जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि बांधकाम कामगार सहभागी झाले होते.