कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे जागोजागी लावलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची दखल घेतली. जिल्ह्यात जनजागृतीचे प्रभावी काम दिसत आहे. जिल्ह्याने नोंदविलेल्या मागणीनुसार २ दिवसात रेमडीसिवीरसह अन्य आरोग्य सामग्री पुरविली जाईल, अशी ग्वाही पालकसचिव राजगोपाल देवरा यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड १९ उपाययोजना बाबत आढावा बैठक झाली. बैठकीत विविध सूचना करताना ते बोलत होते. पालकसचिव देवरा म्हणाले, सध्या बाधित रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये विशेषत: बाधित रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये विशेष लक्ष द्या. प्रभावी सर्वेक्षण करण्यावर अधिक भर द्या. त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. मास्क वापरण्याबाबत कोल्हापूर जिल्हात जनजागृतीचे चांगले काम होत आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दंड करण्यात येत आहे. ही चांगली बाब आहे. यामधून मास्क वापरला पाहिजे हा संदेश सर्वत्र पोहचेल.
खासगी रुग्णालय, प्रयोगशाळेत ‘एचआरसीटी’बरोबरच स्वॅब देखील घेतला जावा, यासाठी सर्वांना सूचना द्याव्यात. वयाच्या ६० वर्षापुढील सर्वांची तपासणी करावी. कोरोनासह इतर व्याधी असणाऱ्या व्यक्तींचीही तपासणी करावी.यावेळी देवरा यांनी फोनवरुन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला. रेमडेसिवीर, आरटीपीसीआर किट, आरएनआय एक्सट्रॅक्शन किट, ॲन्टिजन किट आदींबाबत त्यांनी चर्चा केली.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सविस्तर माहिती दिली. मास्क नसेल तर दुकानदाराने ग्राहकाला परत पाठविले पाहिजे आणि दुकानदाराने मास्क घातला नसेल तर ग्राहक परत जाईल. यामुळे मास्क वापरला जाईल यासाठी ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ हा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, खासगी प्रयोग शाळांकडून एचआरसीटीचा अहवाल दररोज मागवण्यात येतो. रस्त्यावर थुंकणाऱ्यांसाठी ५०० रुपयांचा दंड केला आहे. महापालिकेच्या माध्यमातून आजवर ५० लाख रुपये दंडाची रक्कम गोळा झाली आहे. जनजागृती विशेषत: लोकशिक्षण यावर भर देण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी जिल्ह्यातील कोविड रुग्णालये, केंद्रांना पुरविण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन, अन्य आरोग्य विषयक साधनसामग्री याबाबत माहिती दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एक ऑक्टोबर पासून इली, सारी आणि सहव्याधी व्यक्तींसाठी आरोग्य शिबीराचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, शहर आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ आदी उपस्थित होते.