कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरानामुळे शहर आणि जिल्हयातील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आतापर्यंत तब्बल दीड हजारांवर गेला आहे. यामध्ये दररोज भर पडतच आहे. सध्या काही प्रमाणात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले, तरी धोका कायम आहे. प्रतिबंधात्मक लस नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते, अशी शक्यता आरोग्य प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कोल्हापूर शहरात मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर टप्याटप्याने रुग्णांची संख्या वाढत राहिली. मुंबई, पुण्यातून चाकरमानी परतल्यानंतर खेड्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. जूननंतर विविध विभाग अनलॉक होत राहिल्याने वाहतूक वाढली. नागरिकांचे स्थलांतर गतीने होऊ लागले. राज्य सरकारने जिल्हा, राज्य बंदी उठवली. परिणामी शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
सप्टेंबरमध्ये एका दिवसात तब्बल ९०० ते एक हजारांपर्यंत रुग्ण सापडले. मृत्यूंची संख्या दोन अंकांवर गेली आणि दिवसेंदिवस वाढत गेली. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल १५५० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ४६ हजार ८०८ जणांना या आजाराची लागण झाली. यापैकी ४० हजार ७७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप ४ हजार ४८७ जण बाधित आहेत. ते खासगी रुग्णालयांसह सरकारी केंद्रात उपचार घेत आहेत. पण आतापर्यंत कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांची संख्या चिंताजनक मानली जात आहे. अनेक कुटुंबांतील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील दोन आठवड्यांपासून नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या घटते आहे. रोज शंभर ते २०० पर्यंत बाधितांची संख्या आहे. मृत्यूची संख्याही एक अंकावर आली आहे. पण पूर्ण क्षमतेने बाजारपेठांसह सर्व आस्थापने सुरू झाल्याने पुन्हा कोरोनाच्या साथीचा उद्रेक होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासन कामाला लागले आहे.