मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्व राजकीय पक्ष प्रचार दौऱ्याला सुरुवात केली तर काही राजकीय पक्षातील नेत्यांचे पक्ष बदलण्याचे सत्र सुरु आहे. अशातच आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आता केंद्र सरकारला जनता कंटाळली आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टोला लगावला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे म्हणाले जळगावात बीआरएसला मोठा धक्का बसलाय. बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटलांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे .यामुळे जळगावात ठाकरे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा विजय अधिक मोठा व्हावा, यासाठी सर्वजण एकत्र येत आहेत , राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी मजबूत होत आहे. आता जनतेत असंतोष असून आता केंद्र सरकारला कंटाळली आहे त्यामुळे राज्यात आणि देशात परिवर्तन घडेल अशा विश्वासही त्यांनी यावे व्यक्त केला

एका व्यक्तीच्या हातात देश देणे हे घातक – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आता हुकूमशाहला पुन्हा एकदा स्वीकारणे देशासाठी घातक आहे. एककाळ असा होता की देशाला कणखर नेतृत्व हवे, असे वाटत होते. संमिश्र सरकार नको होते. मात्र,अटल बिहारी वाजपेयी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी संमिश्र सरकार उत्तमपणे चालवले होते. संमिश्र सरकारच्या काळात देशाची प्रगती झाली आहे. आम्हाला देश मजबूत पाहिजे, सरकार संमिश्र पाहिजे. एका व्यक्तीच्या हातात देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही, हे जनतेला समजले आहे. त्यामुळे आम्हाला मजबूत सरकार पाहिजे पण ते संमिश्र हवे. सर्वांना सोबत नेणारा कणखर नेता पाहिजे. जो देईल साथ, त्यांचा करू घात, अशी व्यक्तीअसा पक्ष आम्हाला नको आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंनी केलं राज ठाकरे यांचं कौतुक

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की,“मनसेच्या भूमिकेचं कौतुक करतो. काही जण बिन शर्त पाठिंबा देतात, तर काहीजण लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत. हे नाटक आता जनता ओळखत आहे.” वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीला महाविकास आघाडीसोबत चर्चा केली. पण शेवटी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत अनेक ठिकाणी उमेदवार उभा केले आहेत असे ते म्हणाले