कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘लाईव्ह मराठी’ने वन विभागातील वन मजुरांच्या घोटाळ्यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर वनविभागात खळबळ उडाली आहे. या संदर्भात नुकतेच यातील तक्रारदारांना आणि कांही वन मजुरांना चौकशी समितीचे अधिकारी कांबळे यांनी आपल्या कार्यालयात चौकशीकामी हजर राहण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

मात्र अशिक्षित आणि गरजू वन मजुरांना आपल्या कार्यालयात बोलवून चौकशीचा सोपस्कार पूर्ण करण्यापेक्षा या अधिकाऱ्यांनी अर्जातील गंभीर आरोपाबाबत सखोल चौकशी करावी. आणि कोणाचाही मुलाहिजा न बाळगता शासनाच्या लाखो रुपयाचा तथाकथित अपहार कोणी आणि कसा केला याबाबत चौकशी करुन योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

या सर्व प्रकारावर ‘लाईव्ह मराठी’ वेळोवेळी परखड लिखाण करीत या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. पुढील काळात वन विभाग कोणावर आणि काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.