कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही या उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम गावा गावात राबवून कोरोनाचा संसर्ग थांबवा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.


ते म्हणाले, कोव्हिड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी १५ सप्टेंबरपासून राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत १८०० पथकं घरो घरी जावून सर्वेक्षण करत आहेत. या सर्वेक्षणामधून कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांना शोधून काढण्यात येत आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे, कोव्हिड-19 ची तपासणी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. बाधित रुग्णांना लवकर शोधून लवकर उपचार केले जातील. या मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिक आणि इतर व्यापारी आस्थापना दोघांचेही सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे.
मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही. मास्क नाही तर सेवाही नाही. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे, एकादा दुकानदार मास्क लावून बसला नसेल तर तिथे ग्राहकांने जायचे नाही. एकादा नागरिक विना मास्क दुकानात आल्यास त्याला वस्तू अथवा सेवा द्यायची नाही. याचे उल्लंघन झाल्यास त्यांना दंड करणे किंवा व्यापारी आस्थापनांची दुकाने काही दिवसांसाठी बंद केले जातील. याला जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मोठ्या प्रमाणात दुकानांवर, सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात येत आहेत. अशाच प्रकारे ही मोहीम फार मोठ्या प्रमाणात राबवूया. जेणेकरुन जनजागृती होईल, कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही. या मोहिमेचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक करुन ही मोहीम दुसऱ्या जिल्ह्यात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही मोहीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवून राज्यासमोर आदर्श निर्माण करु.