कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रांतिसूर्य फाऊंडेशनतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून पुरस्कार प्रदान केला जातो. २०२० मधील क्रांतिसूर्य फाऊंडेशनतर्फे निशांत राजेंद्रकुमार गोंधळी (रा. पाचगांव) यांना ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य युवासन्मान पुरस्कार २०२०’ प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी तसेच सुप्रसिध्द अभिनेता स्वप्नील राजशेखर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

निशांत गोंधळी हे सध्या महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेज येथे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी ‘गंधार वाद्यवृंदाची’ निर्मिती केली असून गेली १० वर्षे अनेक सांगितीक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते अविरत कार्यरत आहेत. गायन, कवितालेखन, कथालेखन, कथाकथन, गीतलेखन, नाटयसमीक्षण, वक्तृत्व, निवेदन, अभिनय या क्षेत्रात यांनी उल्लेखनीय काम केले आहे. ‘मनातलं गाव’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून अलिकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या ‘तुझा दुरावा’ या मराठी चित्रपटातही त्यांनी उत्तम भूमिका साकारली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये ‘शिवसन्मान पुरस्कार (२०१८)’ , ‘राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्कार (२०१८)’, ‘ यंग इन्स्पिरेटर्स अॅवॉर्ड (२०१९)’  या पुरस्कारांचा समावेश आहे. त्यामध्ये आता ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य युवासन्मान २०२०’ पुरस्काराचा समावेश झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.