कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज  (१ नोव्हेंबर) ‘काळा दिवस’  पाळला जात आहे. भाषावर प्रांतरचनेवेळी बेळगावसह सीमावर्ती मराठीबहुल भाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ हा दिवस पाळला जातो. यानिमित्त समितीने आयोजित मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर अक्षरश: गनिमी काव्याने उपस्थित राहिल्या. त्यांना बेळगावात पोहोचण्यासाठी काही अंतर रिक्षाने प्रवास करावा लागला.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी एक प्रतिनिधी या मेळाव्याला येत असतो. यंदा चाकणकर हजर राहिल्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंगेश चिवटे देखील मेळाव्याला उपस्थित राहिले. कोरोना महामारीमुळे यंदाची मराठी भाषिकांची निषेध सायकल फेरी आणि जाहीर सभा रद्द करण्यात आली. त्याऐवजी मराठा मंदिर येथे मेळावा घेण्यात आला. यासाठी पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात आला.