कोल्हापूर : सामायिक शेतीच्या वादातून वृद्ध काकाचे अपहरण करून अल्पवयीन पुतण्याने साथीदाराच्या मदतीने खून करून मृतदेह नदीच्या बंधाऱ्यात फेकला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसंत पांडुरंग पाटील( वय ६५ ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चंदगड तालुक्यातील हाजगोळी गावात २६ मार्च रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अल्पवयीन पुतण्यासह त्याचा साथीदार गणेश परशुराम जिंगरुचे (वय २६ रां.सोनोली तालुका बेळगाव , कर्नाटक ) या दोघांना बुधवारी सायंकाळी जेरबंद करण्यात आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत वसंत पाटील व त्यांचा पुतण्या यांच्यात हाळ नावाच्या सामायिक शेतावरून वाद होता. या वादातून त्यांच्यात अनेक वेळा भांडणही झाले होती. २६ मार्च रोजी ते शेतात वरण आणण्यासाठी गेले होते तेव्हापासून बेपत्ता झाले. मुलाने याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. फिर्याद दाखल करण्यात आल्या नंतर पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता.

शेतात वैरण काढत असताना तेथे रक्ताचे डाग दिसले होते यावरून त्यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला होता. ज्या दिवशी वसंत पाटील बेपत्ता झाले त्याच दिवशी त्यांचा पुतण्या शेतात वैरण काढण्यासाठी गेला होता. अशी माहिती पोलिसांना समजली होती. त्यानुसार पोलिसांनी पुतण्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने मित्राच्या मदतीने आपण काकाचा खून केल्याची कबुली दिली.