मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मोठा आरोप केला आहे. आरोप करताना खासदार राऊत यांनी म्हटलं आहे की हे महादेव बेटिंग अॅपचे सदस्य आहेत, भाजप त्यांना तुरुंगात टाकणार होती, पण आता पूजा करत आहे. असा बोचरा वार ही त्यांनी यावेळी केला.


मिळालेल्या माहितीनुसार महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यावरून भाजपने बघेल यांच्याविरुद्ध मोहीमच हाती घेतली आहे. संजय राऊत हे त्याबाबत बोलताना म्हणाले की, ‘भूपेश बघेल भाजपमध्ये सहभागी झाले तर त्यांना तिथे देवाचे स्थान दिले जाईल.

त्यांच्यावर हर हर महादेव म्हणत अभिषेक केला जाईल. महाराष्ट्रात अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हेदेखील महादेव अॅपचेच सदस्य आहेत ना ? त्यांना जेलमध्ये पाठवायचे होते, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्यावर फुले उधळत आहेत,’ अशी खोचक टोला ही त्यांनी लगावला आहे.