कळे (प्रतिनिधी) : मोरेवाडी (ता.पन्हाळा) ग्रामपंचायतीने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात १०० टक्के करवसुली करुन त्यातून आर्थिक बाबींची १५ मार्च पूर्वी अंमलबजावणी केली. यातून या ग्रामपंचायतीने यावर्षी ई-ग्राम स्वराजमध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.

मोरेवाडी ग्रामपंचायतीने नागरिकांकडून पाणीपट्टी, घरफाळा, दिवाबत्ती अशा विविध करांची १०० टक्के कर वसूली केली. गेल्या १८ वर्षांपासून ग्रामपंचायतीने १०० टक्के करवसुली करुन इतर ग्रामपंचायतींसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तसेच ५ टक्के दिव्यांग निधी, १० टक्के महिला व बालकल्याण निधी, १५ टक्के मागास निधी आदी रक्कमांचा १५ मार्चपूर्वी १०० टक्के विनियोग करत ई-ग्रामस्वराजमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.          

याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं. विभाग) अरुण जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, विस्तार अधिकारी वासुदेव कांबळे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले. 

ग्रामसेवक हेमंतकुमार कोळी, सरपंच डॉ.रणजीत तांदळे, उपसरपंच नितिश मोरे, सदस्य कृष्णात मोरे, आनंदी कोळी, सविता रसाळ, विद्या सातपुते, सावित्री सातपुते, लिपिक सर्जेराव मोरे यांनी परिश्रम घेतले.