गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज ते चंदगड राज्य मार्ग गेल्या कांही दिवसांपासून खड्ड्यांनी भरला असून जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत होती. खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे मोठे अपघात घडू लागले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग डोळ्यावर पट्टी बांधून जणू गंधारीच्या भूमिकेत होता.
प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी आज खास मनसे स्टाईल आंदोलनाचे हत्यार उपसले. मराठा चित्रमंदीरानजीकच्या एका मोठ्या खड्ड्याभोवती रांगोळी टाकून त्यांनी चक्क दिवाळीचे अभ्यंग स्नान करत प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी चौगुले यांना आंघोळ घालताना प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी उपस्थित वाहनधारकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेत किमान आत्ता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का असा संतप्त सवाल उपस्थित केला.