कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) शिरोळ तालुक्यातील सातही महसुली मंडळ महाराष्ट्र शासनाकडून दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून घोषित करण्यात आली आहेत त्यामुळे जवळपास सर्वच शिरोळ तालुक्याला दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे जाहीर केल्या सर्व सवलतींचा लाभ तालुक्यातील सामान्य जनता व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असे आदेश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.

शिरोळ तालुका दुष्काळ सदृश्य घोषित झाला असल्यामुळे शिरोळ तहसीलदार कार्यालयात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्यातील सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक सोमवारी घेतली यावेळी ते बोलत होते तहसीलदार अनिलकुमार हेळकर प्रमुख उपस्थित होते.

शिरोळ तालुक्यातील सातही महसुली सर्कलमध्ये सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला असल्यामुळे आपल्या तालुक्याला शासनाच्या सवलतीचे लाभ मिळणार आहेत असे सांगताना दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व नागरिकांना शासन सवलतीचे लाभ प्राधान्याने द्या असे आदेश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना चालू वीज बिलात ३३.५% सवलत मिळणार आहे, थकबाकी पोटी वीज मंडळाकडून शेतकऱ्याची यावर्षी वीज तोडणी करू नये, थकीत बिला बाबत वीज मंडळाने शेतकऱ्यांना हप्ते बांधून द्यावेत अशा स्पष्ट सूचना आमदार यड्रावकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.