कागल ( प्रतिनिधी ) लेखक कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केले, असे गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. लेखणीच्या माध्यमातून आपल्या साहित्यात ग्रामीण जीवन हुबेहुब मांडले, असेही ते म्हणाले. कागलमध्ये एका कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक कृष्णात खोत यांचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, साहित्यिक खोत यांनी आतापर्यंत गावठाण, झडझिंबड, नांगरल्यावीण भूई, धूळमाती, रोंदाळ अन् साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेली रिंगाण या कादंबऱ्या लिहिल्या. एवढ्या अल्पावधीतच मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार म्हणजे त्यांच्या हातून झालेल्या कसदार लिखाणाची प्रचिती आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीवर त्यांचे अफाट प्रेम आहे. साहित्य अकादमी पुरस्काराच्या माध्यमातून त्यांनी इतिहासाची शृंखला तयार केली असल्याचं ही ते म्हणाले.

परवड विस्थापित गावांची……..!

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, श्री. खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. चांदोली धरण बांधताना झोळंबी आणि परिसरातील विस्थापित गावांच्या मनाचा मागोवा आणि विस्थापितांची परवड या कादंबरीत त्यांनी चितारली आहे.

या मर्मभेदी वास्तव चित्रणामुळेच रिंगाण कादंबरी वाचकांच्या मनात खोलवर रुजली असल्याचं ही ते म्हणाले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अतुल जोशी आदी प्रमुख उपस्थित होते.