सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पालकमंत्री पदाची जबाबदारी हाती घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनांचा आढावा घेतला. व सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालये, प्राथमिक शाळा आदींसाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.


पुढे बोलताना मंत्री पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे अशा सूचना देऊन ज्या शाळांमध्ये ग्रंथालय नाहीत अशा गावांमध्ये गाव तिथे ग्रंथालय उपक्रम राबवावे, त्यासाठीही सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील पाटील यांनी दिली.


पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, सर्व राज्यस्तरीय यंत्रणा महापालिका व नगरपालिकांनी माहे जानेवारी 2024 अखेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत मंजूर असलेल्या निधीतून प्रस्तावित केलेल्या कामांचे सर्व प्रक्रिया त्वरित पूर्ण करून माहे डिसेंबर 2023 पर्यंत संबंधित यंत्रणांनी कार्यारंभ आदेश देणे आवश्यक आहे.