कोल्हापूर (प्रतिनिधी) : जादा परताव्याच्या आमिषाने अनेकांना सात लाख ९ हजारांना गंडा घालणाऱ्या शाईन मल्टीट्रेड इंडिया प्रा. लि. कंपनीचे आनंद शिवराम तांबे (वय ४९, रा. कल्याण जि. ठाणे) भूपसिंग सर्ग्यारसिंग (वय ४०, रा. दिल्ली) आणि मोहन अर्जुन केसवाणी (वय ५९, रा. जयपूर) यांना जिल्हा विशेष न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी सात वर्षे कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

आनंद तांबे,  भूपसिंग सर्ग्यारसिंग आणि मोहन केसवाणी यांनी ही कंपनी स्थापन केली होती. लोकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून खाजगी बॅंकेत पैसे भरण्यास सांगितले. आमिषाला भुलून २००९ ते २०१२ या कालावधीत शेकडो महिलांनी पैसे दिले होते. मात्र, परतावा मागितल्यावर कंपनीच्या संचालकांनी टाळाटाळ केली. याबाबत महिलांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर वरील तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत वर्ग करण्यात आला होता.

तीन वर्षे विशेष न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. आज अंतिम सुनावणी झाली. सरकारी वकील अॅड. समीउल्ला पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी शाईन मल्टीट्रेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे तांबे,  सर्ग्यारसिंग  आणि केसवाणी यांना न्यायालयाने  यांनी सात वर्षे कारावास आणि प्रत्येकी एक लाखाचा दंड ठोठावला आहे.