धामोड (प्रतिनिधी)  :  मागील ३०  वर्षांच्या काळात धामोड  (ता. राधानगरी) परिसरातील सुज्ञ सभासदांनी राजाराम साखऱ कारखान्याच्या प्रत्येक योजनेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नियमितपणे ऊस पुरवठा केला आहे. तरी आगामी निवडणुकीत  शेतकरी सभासदांनी महाडिकांच्या पाठीशी  राहावे, असे आवाहन माजी आ. अमल महाडिक यांनी आज (शनिवार) येथे केले.

धामोड पैकी जाधववाडी येथे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासद-कर्मचारी-प्रशासन सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सभासद शंकर जाधव यांच्या हस्ते  अमल महाडिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाडिक यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन निरसन करत कारखान्याच्या आगामी निवडणुकीत आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कारखान्याचे संचालक के. पी. चरापले,  माजी व्हा. चेअरमन एल. एस. पाटील,  माजी उपसरपंच सुभाष गुरव,  सदाशिव कोरे, शंकर जाधव, राजाराम तेली, बाजीराव जोंधळकर,  भगवान सावंत, गणपती जाधव, भिकाजी जाधव आदीसह सभासद,  कर्मचारी उपस्थित होते.