नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे. मराठी भाषा न बोलणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सच्या दुकानासमोर आंदोलन करणाऱ्या शोभा देशपांडे यांच्या मतांशी सहमत नाही, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
मराठमोळ्या लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने चोप दिला. देशपांडे यांनी १२ तासांहून अधिक काळ कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सच्या दुकानासमोर आंदोलन केले. दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध देशपांडेंनी रात्रभर ठिय्या मांडल्यानंतर सकाळी आंदोलनस्थळी आलेले मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला चोप दिला. त्यानंतर मंत्री आठवलेंनी देशपांडे यांच्या मताशी सहमत नसल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली.