नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) देशातील 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आज म्हणजेच सोमवारपासून सुरू झाले आहे. हे सत्र अनेक अर्थाने खास असणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक खासदारांनी शपथ घेतली. उर्वरित खासदारांनाही प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी शपथ दिली. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी महिला खासदारांचा एक फोटो शेअर केला आहे.

मोइत्रा यांनी 2019-2024 मधील छायाचित्रे केली शेअर

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सोमवारी 18 व्या लोकसभेचे पहिले सत्र सुरू असताना काही विरोधी महिला लोकसभा खासदारांसह 2019 विरुद्ध 2024 ची छायाचित्रे पोस्ट केली. 2019 मधील जुन्या फोटोमध्ये खासदार मोईत्रा, कनिमोझी, सुप्रिया सुळे, जोथिमनी आणि ठमिझाची थंगापांडियन हे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात एका बाकावर बसलेले आहेत, तर 2024 च्या फोटोमध्ये लोकसभेच्या नवीन खासदार डिंपल यादव देखील दिसत आहेत.

‘योद्धे परत येतायेत’

“योद्धे परत आले आहेत,” मोइत्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट केलेल्या फोटोला कॅप्शन दिले. मोईत्रा पश्चिम बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तर कनिमोझी तामिळनाडूच्या थुथुकुडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. इतर खासदार – सुप्रिया सुळे, जोथिमनी, थमिझाची थंगापांडियन आणि डिंपल यादव अनुक्रमे महाराष्ट्राच्या बारामती मतदारसंघाचे, तामिळनाडूच्या करूर मतदारसंघाचे, चेन्नईच्या दक्षिण मतदारसंघाचे आणि उत्तर प्रदेशच्या मैनपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

74 महिलांनी बाजी मारली

एकूण 74 महिलांनी लोकसभा निवडणूक जिंकली आहे, जी 2019 मध्ये निवडून आलेल्या 78 पेक्षा थोडी कमी आहे. कनिष्ठ सभागृहात निवडून आलेल्या एकूण महिला खासदारांमध्ये पश्चिम बंगाल 11 महिला खासदारांसह आघाडीवर आहे. 18 व्या लोकसभेच्या अधिवेशनाची सुरुवात सोमवारी पंतप्रधान मोदी आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांनी संसद सदस्य म्हणून शपथ घेऊन केली.