गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जनता दलाच्या महेश कोरी यांनी बाजी मारली. विरोधी ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवार सावित्री पाटील यांचा त्यांनी १५ विरुद्ध ५ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे ‘गडहिंग्लज’च्या इतिहासात पत्नी विद्यमान नगराध्यक्षा असताना उपनगराध्यक्षपदी विराजमान होताना महेश कोरी यांनी ‘न भूतो…’ असा विक्रमही केला.

शकुंतला हातरोटे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आज (मंगळवार) उपनगराध्यक्ष पदासाठी ऑनलाईन निवडणूक झाली. चार वेळा बिनविरोध झालेल्या उपनगराध्यक्ष निवडीनंतर आज प्रथमच जनता दलाच्या विरोधात राष्ट्रवादीनेही अर्ज दाखल केला होता. सावित्री पाटील यांना त्याच्या स्वतःच्या मतासह हारून सय्यद, रेश्मा कांबळे, शुभदा पाटील व रुपाली परीट अशी पाच मते मिळाली. तर यापूर्वीच जनता दलात प्रवेश केलेल्या शशिकला पाटील यांच्यासह भाजपचे नगरसेवक दीपक कुराडे, शिवसेनेच्या श्रद्धा शिंत्रे यांचेसह जनता दलाच्या सर्व नगरसेवकांनी महेश कोरी यांना मतदान केले. त्यामुळे पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी महेश कोरी यांना १० मतांनी विजयी घोषित केले. तहसीलदार दिनेश पारगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

कोरी यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आणि गुलालाची आतषबाजी करीत जल्लोष केला. जनता दलाचे नेते व माजी आमदार श्रीपतराव शिंदे, तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, शहराध्यक्ष काशीनाथ देवगोंडा,  बाळकृष्ण परीट, रमेश मगदूम यांचेसह जनता दलाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.