अमरावती : अमरावतीत प्रचार सभेच्या मैदानावरून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी रीतसर परवानगी घेऊन मैदानावर सभा घेणार होते. तशी परवानगी ही त्यांनी काढली होती. पण केंद्रीय मंत्री अमित शाह हे बुधवारी अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. तसेच परवानगी नसताना ते या मैदानावर सभा घेणार आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी अमरावती दौऱ्यावर येणार आहे. अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह उद्या सभा घेणार आहे. या सभास्थळावरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. बच्चू कडू यांनी सायन्सकोर मैदानावर सभेसाठी परवानगी घेतली असताना आता त्यांना सभास्थळी जाण्यापासून पोलिसांनी अडवलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी बच्चू कडूंना अडवलं. यानंतर बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

बच्चू कडू आणि पोलिसांमधील संपूर्ण संवाद
कडू – कायद्यापेक्षा माणसं मोठे नाहीत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला ते मैदान शाहा यांच्या सभेला द्यावे लागत आहे, असे पोलीस सांगत आहेत.
पोलीस – तुम्ही माझ्यासोबत चला. सुरक्षेची काय तयारी आहे ते मी तुम्हाला दाखवतो.
कडू – पण मैदानात सभा घेण्याची परवानगी आमच्याकडे आहे. तुम्ही पार्टीचा झेंडा लावा. तुम्ही कायद्याला तोडा.
कडू – शिंदे साहेब मी तुमच्या पाया पडतो. (बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्याच्या पाया पडले)
पोलीस अधिकारी – तुम्हाला सभेसाठी परवानगी दिलेली आहे, हे मी मान्य करतो.
कडू – कायद्याने परवानगी कोणाला मिळालेली आहे.
पोलीस अधिकारी- तुम्हाला
कडू- मग परवानगी रद्द कशी झाली. तुम्ही कोणाच्या अधिकारात ही परवानगी रद्द केली. तुम्हाला कायदा मान्य नाही का? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात का? तुमच्या पाय धरू का.
पोलीस अधिकारी- साहेब तुम्ही लोकप्रतिनिधी आहात.
कडू – तुम्ही पोलीस अधिकारी आहात. आम्हाला कायदा शिकवू नका. तुम्ही कायदा पायदळी तुडवत आहात. तुम्ही आचारसंहितेचा भंग करत आहात. तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहात.
पोलीस अधिकारी – शांत व्हा
कडू – काय शांत व्हायचं?
पोलीस अधिकारी – साहेब शांत व्हा. मी तुम्हाला समजावून सांगतो.
कडू – काय शांत व्हायचं. तुम्ही कायदा तोडत आहात. तुम्हाला हे गृहमंत्री सांगत आहेत का. तुम्हाला अमित शाहा कायदा तोडायचं सांगत आहात का?
पोलीस अधिकारी – आपण यापूर्वी अनेकवेळा भेटलेलो आहोत. माझं दोन मिनिट एकूण घ्या. माझी तुम्हाला विनंती आहे, पाच मिनिट शांत व्हा. पाणी घ्या.
बच्चू कडू – परवानगी भेटलेली असताना आम्हाला सभा का घेऊ देत नाहीत. शिंदे साहेब तुम्ही कायदा तोडत आहात. त्यांनी सभा दुसरीकडे घ्यावी. 18 तारखेला आम्ही सभेसाठी रितसर परवानगी घेतली. एका बदलीसाठी तुम्ही कायदा तोडता.
पोलीस अधिकारी – बदलीचा प्रश्न नाही साहेब. लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमचा आदर करतो.
कडू- तुम्ही काय आदर करता, रंगबाजी चालू आहे. परवानगी नसता तुम्ही त्यांच्या सभेला परवानगी कशी देता.
पोलीस अधिकारी – सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामागे कोणताही राजकीय उद्देश नाही.
कडू – आपण इथेच बसू. पाया पडतो ( असं म्हणत बच्चू कडूंनी पोलिसांपुढे लोटांगण घातलं.)
पोलीस अधिकारी – साहेब शांत व्हा.
कडू – हे कायदा तोडायचं काम तुम्हाला गृहमंत्री अमित शाह सांगत आहेत का?
पोलीस अधिकारी – तुम्हाला परवानगी भेटली होती पण आधी ऐकून घ्या.
कडू – परवानगी आहे, मग आम्हाला सभास्थळी येऊ का देत नाही? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करता का?
पोलीस अधिकारी – 24 तासाच्या आतमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांसाठी सुरक्षेची व्यवस्था करावी लागत आहे. त्यासाठी आम्हाला सुरक्षेसाठी हे करावं लागत आहे.
कडू – मग फक्त त्यांचीच सभा आहे का, आमची नाही का? आम्ही 18 तारखेला अर्ज देऊन रितसर परवानगी घेतली, परवानगी मिळाली. त्यांची सभा होणं जसं अनिवार्य आहे, तसं आमची सभा होणं ही अनिवार्य आहे. आता तुम्ही कायदा का मोडत आहात. बदली सुरु आहे का, तुमची एका बदलीसाठी तुम्ही कायदा मोडत आहात.
पोलीस अधिकारी – बदलीचा हा विषय नाही.
कडू – काय अडचण आहे, असं म्हणत बच्चू कडूंसह कार्यकर्ते पोलिसांच्या पाया पडले.
पोलीस अधिकारी – गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलावं लागत आहे.
कडू – एखादी परवानगी मिळाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव ती परवानगी रद्द करता येते का?
पोलीस अधिकारी – तो त्यांच्या अधिकार आहे, आम्ही परिस्थिती कळवली आहे.
कडू – शिंदे साहेब उद्याची सभा घ्या, गळ्यात पट्टा घालून घ्या. जमवून टाकलं तु्म्ही. कायदा न पाळण्यासाठी तुम्हाला सलाम. पैसे दिले का तुम्हाला?
पोलीस अधिकारी – आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव हे करत आहोत. याचा दुसरा कोणताही हेतू नाही.
कडू – सुरक्षेचं कारण सांगू नका, तुम्ही गळ्यात पट्टा घाला. परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करत आहात. (असं म्हणत बच्चू कडूंनी परवानगी पत्र फाडलं.)