कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘निराधारांना आधार’ या तत्वानुसार अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून कणेरी मठ येथे सिद्धगिरी हॉस्पिटलच्या दुसऱ्या विस्तारित कोव्हिड सेंटरचा लोकार्पण सोहळा आज (गुरुवार) अदृश्य काडसिद्धेश स्वामीजी आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पं.पू. मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयात बेड कमतरता भासत आहे. त्यामुळे काही महिन्यापूर्वी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये कोरोना विभाग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या ४० बेडच्या विस्तारित कोव्हिड युनिटची उभारणी करण्यात आली आहे. आज या दुसऱ्या कोव्हिड युनिटचा शुभारंभ अदृश्य काडसिद्धेश स्वामीजी आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

यामध्ये प्रामुख्याने व्हेंटिलेटरचे ७ बेड, ऑक्सिजनचे २३, तर नॉन ऑक्सिजनचे १० बेड अशा सर्वसोयीनयुक्त ४० बेडचे अद्यावत कोविड रुग्णालय लोकांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. कोरोना संसर्गानंतरही उद्भवणाऱ्या अनेक आजारांवर उपचार करणारे केंद्र म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटल नावारूपास येईल. अद्यावत उपकरणे, तत्पर वैद्यकीय स्टाफ, कोरोना निदानासाठी एचआरसिटी, अद्यायावत प्रयोगशाळा एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा मिळत असल्यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांसाठी एक आधारवड ठरणार आहे.

यावेळी प.म.दे.स. अध्यक्ष महेश जाधव, माजी जि.प. अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक,राहुल चिक्कोडे, डॉ.प्रकाश भरमगौडर, डॉ.सौरभ भिरूड, डॉ.तनिष पाटील, डॉ.सचिन पाटील, डॉ. रेशम रजपूत, डॉ. जितेंद्र रजपूत, सदस्य उपस्थित होते.