कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलवमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी घरात खड्डा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील सरपंचामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला असून मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी कोल्हापूरच्या राधानगरी पोलिसांनी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये राहणाऱ्या शरद माने यांच्या घरामध्ये गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केला जात होता. पण याच गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी हा सर्व प्रकार उघड केला. शरद माने यांच्या घरामध्ये मोठा खड्डा खोदून त्याठिकाणी धार्मिक विधी सुरू होते. घटनास्थळावर अंगारा, हळद- कुंकू, गुलाल, लिंबू हे सर्व साहित्य देखील होते.

या प्रकरणी कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नरबळी आणि जादुटोणा कायद्यान्वये दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता गुप्तधन मिळण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न सुरू होता का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.