कोल्हापूर (प्रतिनिधी) : आताच्या शिक्षण व्यवस्थेत बदल करून केजी टू पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत होण्यासाठी अपक्ष म्हणून पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक रिंगणात राहणार आहे. भाजप सोडून सर्व पक्षांचा पाठिंबा घेणार आहे. पण कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी घेणार नाही, अशी माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुंभार म्हणाले की, समाजातील प्रत्येक वाईट गोष्टीस अप्रत्यक्षपणे शिक्षण व्यवस्था कारणीभूत आहे. आजचे शिक्षण घेवूनही नोकरी मिळेल याची शास्वती नाही. यामुळे शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज आहे. गेल्या ३८ वर्षापासून शिक्षकी पेशात तसेच विविध सामाजिक चळवळीत सक्रिय आहे. शिक्षणासंबंधीचे प्रश्न सभागृहात जावून मांडण्यासाठीच रिंगणात आहे. निवडूण आल्यानंतर आमदारकीचा पगार, पेन्शन घेणार नाही. निस्वार्थीपणे समाजातील सर्व घटकापर्यंत मोफत शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
तसेच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांना सन्मान मिळत नाही. नोकरी लागल्यानंतर त्यांना तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून वेठबिगाराप्रमाणे राबवून घेतले जात आहे. दोन कोटी रूपये देवून वैद्यकीय शिक्षण घ्यावे लागते. त्यात बदल होण्यासाठी आतापर्यंत चळवळीतून रस्त्यावर लढलो आहे. आता सभागृहात लढण्यासाठी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. कोणीही दबाव टाकला तरी माघार घेणार नाही. लढणार, जिंकणार आणि शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी सांगितले.