कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवामार्फत बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी बढाओ या योजनेंतर्गत दि. ११ ते १७ ऑक्टोबर हा सप्ताह आंतरराष्ट्रीय बालिका सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.

या सप्ताहामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा, तालुका, प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. तर या कालावधीत प्रभातफेरी, रॅली सामाजिक अंतर ठेवून मास्क वापरून आयोजन, ऑनलाईन पोस्टर, घोषवाक्य, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, मुलींच्या नावे वृक्षारोपन करणे, मुलींच्या जन्माचा दाखला वाटप, बेबी केअर किट वाटप, ताराराणी, प्राधान्य कार्ड, माझी कन्या भाग्यश्री ठेवपावतींचे वितरण असे विविध कार्यक्रमांचे आयोजन या कालावधीत करण्यात आले आहे.