मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आलीय. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने एशिया कप 2025 मधून माघार घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. ही स्पर्धा सप्टेंबर 2025 मध्ये होणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, बीसीसीआयने एशियन क्रिकेट कौन्सिलला (ACC) कळवले आहे की भारत जूनमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग एशिया कप आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुष एशिया कपमध्ये सहभागी होणार नाहीत.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा हा निर्णय पाकिस्तान क्रिकेटला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे पाकिस्तानचे मंत्री आहेत. त्यामुळे भारत त्यांच्या अध्यक्षतेखालील स्पर्धांमध्ये सहभागी होणार नसल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. बीसीसीआय ने पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग टीम्स एशिया कपमधूनही माघार घेतल्याचे कळवले आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी असेही संगीतले की, भारतीय संघ अशा संस्थेच्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही ज्याचे नेतृत्व पाकिस्तानचा मंत्री करतो. अशीच देशाचीही भावना आहे. एसीसीला यासंदर्भात मौखिक स्वरूपात सूचना देण्यात आली असून भविष्यातील सहभागही थांबवण्यात आला आहे. भारत सरकार याबाबत सतत फॉलोअप घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे.