कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी त्यासाठी पाठपुरावा करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहिले होते. कलाकारांना सन्मानाने जगता यावे, यासाठी मानधनात वाढ करावी अशी मागणी खा. महाडिक यांनी केली होती.

तसेच आयुष्यभर ज्यांनी कलाक्षेत्रात काम केले, अशा कलाकारांना सन्मानाने जगता यावे तसेच त्यांच्या कलेबद्दल आदर व्यक्त व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून दिल्या जाणार्‍या मानधनात वाढ करावी. यापूर्वी राज्य शासनाकडून वृध्द साहित्यिक आणि कलाकारांना दरमहा केवळ एक हजार रूपये मानधन मिळत होते. मानधनाची ही रक्कम अत्यंत अपुरी होती. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी वृध्द कलावंतांच्या व्यथा आणि अपेक्षा जाणून घेत, मानधनात भरीव वाढ करावी, अशी मागणी केली होती.

त्यानुसार आता राज्य सरकारच्यावतीने वृध्द साहित्यिक आणि कलाकारांना दरमहा पाच हजार रूपये मानधन देण्यात येणार आहे. राज्य शासनाने सुमारे पाचपट मानधन वाढ केल्याने राज्यातील कलाकारांमध्ये समाधानाची भावना आहे. तर खासदार महाडिक यांनी याप्रश्नी पाठपुरावा केल्याबद्दल अनेक कलाकारांनी खासदार महाडिक यांचे आभार मानले.