सोलापूर ( प्रतिनिधी ) विजयापूर – सोलापूर महामार्गालगत नांदणी येथे वन विभागाने साकारलेल्या नंदनवन उद्यानाचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हे नंदन वन अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केले असल्याचे अधोरेखित करून या प्रकल्पाला अधधिकाधिक सोलापूरकरांनी भेट द्यावी असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सोलापूर-विजयापूर महामार्गालगत पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात आलेले नंदनवन उद्यान उत्तम झाले आहे. उर्वरित टप्प्यातील काम जलदगतीने पूर्ण करावे. तसेच, या उद्यानाची उपयोगिता वाढावी यासाठी शाळांच्या सहली आयोजित कराव्यात. अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी केल्या.

पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बलांना संपूर्ण देशात तीन कोटींपेक्षा जास्त घरे बांधून देण्यात आली. त्यापैकी ३० हजार घरे एकाच ठिकाणी बांधण्यात येत आहेत. त्यापैकी १५ हजार घरे तयार आहेत. उद्या दिनांक १९ जानेवारी रोजी पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होणार आहे.

देशातील अशाप्रकारे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. यावेळी आमदार सुभाषबापू देशमुख, उपवनसंरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील, सरपंच शिवानंद बंडे, डॉ. चनगोंडा हविनाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांच्यासह नांदणी गावचे ग्रामस्थ आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.