महाडिकवाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व शक्ती मंडलिकांच्या मागे राहिल असे वचन आम्ही दिले आहे. त्या वचनाशी जनसुराज्य पक्ष बांधिल आहे. ‘जनसुराज्य ‘ पक्ष ज्या दिशेने जातो त्याच दिशेने विजयाचा गुलाल जातो. हा इतिहास आहे. असा विश्वास जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला. ते महाडिकवाडी (ता. पन्हाळा) येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशिल माने यांच्या प्रचारार्थ झालेल्या कार्यकत्यांच्या भव्य मेळाव्यात बोलत होते.

आ. कोरे म्हणाले, शिवसेनेत बंड झाले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारून संजय मंडलिक यांना ‘शब्द ‘ दिला आहे. मंडलिकांच्या मागे शक्ती उभी करण्याचे वचन दिले आहे. त्या वचनाला जनसुराज पक्ष बांधील आहे. ज्या दिशेने जनसुराज्य पक्ष जातो, त्या दिशेने विजयाचा गुलाल उधळला जातो. हा इतिहास आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊन जनसुराज्यची सर्व ताकद संजय मंडलिकांच्या पाठीशी असल्याने जोतिबाचा ‘ चांगभलं चा ‘ गुलाल संजय मंडलिकांच्यावरच पडणार.

पन्हाळा आणि करवीर तालुक्याच्या मताधिक्याची काळजी सोडून द्या येथील दोन्ही गट कामाला लागले आहेत. ८५ टक्के पेक्षा जास्त मतदान संजय मंडलिकाच्या पारड्यात टाकल्याशिवाय आम्ही स्वतः बसणार नाही. २०१४ च्या निवडणूकीत मोदींची लाट असताना ‘ जनसुराज्य ‘ धनंजय महाडीकांच्या मागे उभा राहिला. त्यावेळी खासदार महाडीक विजयी झाले होते. २०१९ ला खासदार संजय मंडलिक यांना पाठींबा दिला ते विजयी झाले. या वेळीही खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमच्यातील एकही गट बाजूला जाणार नाही. पूर्ण ताकद लावून या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणारच. असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संजय मंडलिक म्हणाले, सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता आता निकालाची नाही, तर मताधिक्याचे औत्सुक्य लागले आहे. आमदार विनय कोरे यांनी आम्हा दोन्ही उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी घेतली. त्याबद्दल आभार व्यक्त करून ते म्हणाले, जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरु होत्या की करवीर, पन्हाळात काय होणार ? पण आजचे कार्यकर्त्यांचे तुफान वादळ पाहील्यावर त्या चर्चा बंद होतील. आणि मागील मताधिक्यापेक्षा वाढीव मताधिक्य मिळेल. असा मंडलिक यांनी विश्वास व्यक्त केला.

खासदार धनजंय महाडिक म्हणाले, भाजपाने संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले, ज्योतिरादित्य सिंधीयाना राज्यसभेवर संधी दिली. त्याप्रमाणे काँग्रेसने येथील उमेदवाराच्या वयाचा विचार करता त्यांना राज्यसभेवर पाठवून सन्मानच करायला पाहिजे होता. पण काँग्रेसला राजेंना त्रासच द्यायचा आहे असे दिसत असल्याचे खा. महाडिक म्हणाले.

यावेळी माजी जि. प. सदस्य शिवाजीराव मोरे, बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई, दगडू पाटील, प्रकाश पाटील सरपंच दिपाली पाटील, बी. के. शिंदे, विकास पाटील, जनसुराज्यचे प्रवक्ते राजेंद्र पाटील, भाजपा जिल्हासचिव संदीप पाटील, लालासो पवार, पांडूरंग काशीद, स्नेहदिप पाटील, विविध गावांचे सरपंच विविध संस्थाचे पदाधिकारी, जनसुराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.