मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तास प्रचारालाही वेग येत आहे. दरम्यान,काल माघारीचा दिवस होता. यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली यामध्ये बारामती आणि माढा लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाच्या उमेदवारांना तुतारी चिन्ह आहे. पण निवडणूक आयोगाने दुसऱ्या अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह दिल्याने गोंधळ उडाला आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने निवडणूक आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

लोकसभेच्या निवडणूक चिन्ह वाटपात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली असून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

बारामती लोकसभेमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 07 मे ला मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी 12 ते 19 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. या कालावधीत 51 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. या अर्जांची छाननी 20 एप्रिल रोजी झाली. छाननीमध्ये पाच अर्ज बाद होऊन 46 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. यांतील आठ उमेगदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यानंतर आता बारामती लोकसभेतून एकूण 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण यांतील एका अपेक्षा उमेदवाराला तुतारी हे निवडणूक लढण्यासाठीचे चिन्ह देण्यात आल्याने आता बारामती लोकसभेत दोन उमेदवारी एकाच चिन्हावर म्हणजेच तुतारीच्या चिन्हावर लढणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह हे ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे आहे. पण शेख यांना तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. पण या चिन्हावरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि ज्या कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून याबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याचे बोलले जात आहे. ज्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबत काय निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.