कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. जलसंपन्न असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यालाही दुष्काळाची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. राजाराम कारखान्याने गतवर्षी राबवलेले ओढा पुनरुज्जीवनासारखे कार्यक्रम जिल्हाभर राबवण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत महाडिक यांनी जलसंधारणासाठी विशेष प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची सूचना केली. तसेच राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदायी असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास दुष्काळाचा सामना निश्चित करता येईल.

तसेच शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास टंचाई जाणवणार नसल्याचे महाडिक म्हणाले. तर जिल्हाधिकारी रेखावार यांनी, शासनाकडे प्रस्ताव सादर करून निश्चितच योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन अमल महाडिक यांना दिले.