कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाहन उद्योग क्षेत्र प्रचंड मोठ्या स्थित्यंतरामधून जात आहे. इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंटरनेट ऑफ थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर वाहन क्षेत्रामध्ये होत आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या कक्षा अतिशय रुंदावत असून त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला प्रचंड मोठी संधी उपलब्ध आहे असे मत निसान डिजिटल इंडियाचे प्रमुख रमेश मिरजे यांनी केले.

ते डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटच्यावतीने आयोजित सेमिनारमध्ये बोलत होते. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानचा वापर कसा होतो आहे हे अतिशय विस्तृतपणे ऑडिओ व्हीज्युअलच्या माध्यमातून समजावून सांगितले.

रमेश मिरजे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आत्मसात करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या ध्येयाप्रती वाटचाल करावी. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये होणारे निरनिराळे बदल आत्मसात करून त्याद्वारे आपला इंडस्ट्री कनेक्ट वाढवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच वेगवेगळ्या हकेथॉन, प्रोजेक्ट एक्जीबिशनस आणि सेल्फ लर्निंग अबिलिटीज निर्माण कराव्यात.

‘गेट’ परीक्षेमध्ये देशात प्रथम आलेल्या रमेश मिरजे यांनी त्यांचा शालेय जीवनापासून ते आयआयटी मद्रासचा ‘बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट’, प्रतिथयश अशा आयआयएम अहमदाबादमधील गौरवपूर्ण प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला.

डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ अजित पाटील यानी पाहुण्यांचे स्वागत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विनायक पुजारी, प्रा. हुद्दार, प्रा. अभिजीत मटकर आणि प्रा. अश्विन देसाई यांनी प्रयत्न केले.

कुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुद्गल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.