मुंबई – सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची याचीच जोरदार चर्चा सुरु आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत १५०० रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय कार्यालयाच्या बाहेर महिलांनी या योजनेसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत महत्वाची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारच्यावतीने अर्थमंत्री अजित पवारयांनी नुकतेच विद्यमान राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, महिला शेतकरी आणि गृहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आणि क्रांतीकारी निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा होय. या निर्णयाच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना आणखी सुलभ करण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, आता 21 ते 65 वर्षांपर्यंतच्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर, एका कुटुंबातील 2 महिलांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. सरकारने या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, एका कुटुंबातील दोन महिलांना ह्या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार, एक विवाहित आणि एक अविवाहित महिला भगिनींना देखील योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. आम्ही कुटुंब नियोजन करुन चूक केली का, असा जो सवाल येतो त्याच प्रश्नाचं उत्तरही यातून दिलंय, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, 1 जुलैपासून पुढील 60 दिवसांत जे अर्ज करतील, त्यांना 1 जुलैपासूनचे पैसे मिळतील आणि 1 ऑगस्टनंतर जे अर्ज करतील, त्यांना अर्ज केल्यानंतरच्या महिन्यापासून पैसे मिळतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद सभागृहात माहिती देताना दिली.