कळे (प्रतिनिधी) : कळे-म्हासुर्ली मार्गावरील वेतवडे पैकी खामणेवाडी (ता.पन्हाळा) येथील शेतकरी संजय दळवी यांच्या शेतात अघोरी करणी प्रकार केल्याची धक्कादायक घटना १५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
त्यांच्या गावकी नावाच्या शेताच्या बांधालगत खड्डा खणून पाच हिरव्या पपई, दोन नारळ, लिंबू, बिबं आणि त्याला टाचण्या टोचलेल्या, दोन तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या बाहुल्या, मीरी, पाच कडधान्य, आंब्याची पाच पाने, अंगारा असे पदार्थ पत्रावळीवर ठेऊन शेतात एक ते दीड फुट खड्डा खणून गाडण्यात आले होते. अघोरी पूजा, करणी, भानामती यांसारख्या प्रकारांतून काही भोंदूबाबा लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. अमावस्या, पौर्णिमा व इतर दिवशी असे प्रकार केले जात असल्याचे दिसून येते. या घटनेमुळे खामणेवाडी परिसरात भीतीचे वातावरण असून या प्रकाराची चौकशी होण्याची मागणी शेतकरी संजय दळवी यांनी केली आहे.