कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती देणाऱ्या राज्य शासनाच्या सहकार व पणन खात्याच्या परिपत्रकाची कागल तहसीलदार कार्यालयासमोर भाजपा आणि किसान मोर्चाच्या वतीने होळी करण्यात आली. शेतकरी हिताच्या आड येणाऱ्या राज्य शासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला.
यावेळी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील म्हणाले, केंद्र शासनाने शेतकरी हितासाठी कृषी विधेयक कायदा केला. शेतकरी हिताच्या व शेतक-यांना त्यांचा माल कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करण्याबाबत राज्यांना आदेश पारित केले आहेत. मात्र, राज्य सरकार चुकीच्या पद्धतीने परिपत्रक काढून त्याच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याचा उद्योग करीत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. चुकीच्या पद्धतीने स्थगिती आदेश देऊन शेतकरी आणि नागरिकांचे राज्य शासन नुकसान करीत आहे. शेतक-यांच्या वतीने याविरोधात राज्यभर आवाज उठवला जाईल, असेही ते म्हणाले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस एम. पी. पाटील बाबगोंडा पाटील, तालुकाध्यक्ष संजय पाटील, आप्पासो भोसले, राजेंद्र जाधव, सुनील मगदूम, नंदकुमार माळकर, प्रकाश पाटील, संजय चौगुले, उत्तम पाटील, दिनकर वाडकर, नामदेव बल्लाळ, एल. डी. पाटील, सुधीर पाटील, गजानन माने, आदी उपस्थित होते.