उत्तुर ( प्रतिनिधी ) नेत्यावरील प्रेम आणि निष्ठा यांची प्रचिती म्हणजे उत्तूर विभाग. माझ्या आमदारकीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या या विभागाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. विधानसभेप्रमाणेच लोकसभेलाही या भागातून विभागातून उच्चांकी मतदार नोंदवून प्रा. संजय मंडलिक यांच्या खासदारकीच्या विजयाचे शिलेदार व्हा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

या विभागातील मोठ्या प्रमाणात मतदान मुंबई, पुणे, इचलकरंजी, कोल्हापूर येथे वास्तव्यास आहे. एक- एक मताची शिकस्त करून सर्वच्या सर्व मतदान आणण्यासाठी कंबर कसा, असेही ते म्हणाले. उत्तुर ता. आजरा येथे उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री श्री. मुश्रीफ अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


पालकमंत्री श्री. मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वी हा विभाग कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट झाला. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी रचलेल्या विकास मंदिराच्या पायावर कळस चढवण्याचे भाग्य मला मिळाले. या विभागातील जनतेनेही माझ्यावर प्रचंड प्रेम केले. मी सदैव त्यांच्या ऋणात राहील. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चूक झाली तर जिल्हा परिषदेला सुधारता येते. जिल्हा परिषदेला चूक झाली तर विधानसभेला सुधारता येते. परंतु; लोकसभेची ही निवडणूक देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. सबंध देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत केवळ माझ्यासाठी म्हणून नको तर नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोठे मताधिक्य द्या, असे आवाहनही त्यांनी केले.


प्रा. मंडलिक पुढे म्हणाले, देशाचे भवितव्य ठरविणारी ही लोकसभेची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बणवून 405 खासदारांचा टप्पा पार पाडायचा आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक राजकीय घडामोडी झाल्या. कोरोनासारखी महामारी अनुभवली जिल्ह्यातील 938 गावांना 800 कोटी निधी देताना अडचणी आल्या. मात्र अतिवृष्टी, विमानतळ, महामार्ग यासारखे प्रमुख प्रश्न आपण सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिलो.

गेल्यावेळी दोन लाख, 70 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांचा पाठिंबा असल्याने विजयाची खात्री आहे.आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे म्हणाले, कागल विधानसभा मतदार संघात उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघात सर्वात जास्त मताधिक्य प्रा. मंडलिक यांना मिळेल.