कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला गुरूवारपासून (दि. ७)  सुरूवात होत आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावर यांनी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

त्या खालीलप्रमाणे

1)  कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसुल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक, सार्वजनिक आरोग्य विभागाने  ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.

2)  सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासनाची  पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

3) महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

4)  यावर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.

5)  देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता ४ फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फुटांच्या मर्यादेत असावी.

6)  मागील वर्षीप्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. कृत्रीम विसर्जस्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

7)  नवरात्रोत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे.

8)  गरबा, दांडीया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.

9)  देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.

10)  देवीच्या मंडपामध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत आरोग्य विभागाच्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

11)    आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.

12)   मंडपात  एकाचवेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल.

13)   देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

14)  महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

15)  विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर, मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

16)  दस-याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा.