मुंबई (प्रतिनिधी) : देशात इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मोदी सरकारवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.  

पेट्रोल पंप ‘गुडमॉर्निंग अण्णा’ बोलतोय, तर गॅस सिलेंडर ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’ असा प्रश्न शेजारी बसलेल्या अण्णा हजारे यांना विचारत असल्याचे व्यंगचित्र काढत क्लाईड क्रास्टो यांनी अण्णा हजारे यांचा चिमटा काढला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून अण्णा हजारे यांना पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीवर जोरदार फटकारे मारले आहेत. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले. अण्णांना पेट्रोल पंप गुडमॉर्निंग अण्णा बोलून जागा करत आहे. तर चक्क गॅस सिलेंडरच ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’ असा प्रश्न करत असल्याचे व्यंगचित्रातून  दाखविण्यात आले आहे.