कुडाळ (प्रतिनिधी) : गेले कित्येक वर्षे महावितरण, पणदूर यांच्याकडे अणाव घाटचेपेडवाडीसाठी नवीन ट्रान्सफार्मरची मागणी केली होती. परंतु, या मागणीला वीज वितरण कंपनीने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे वीज वितरणने या गावासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर द्यावा अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या वाडीमध्ये एकूण 45 घरे असून येथे कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. यामुळे शेती पंप तसेच घरातील विद्युत उपकरणे चालत नाहीत. तसेच टीव्ही, फ्रिज, मिक्सर, इस्त्री, सारखी उपकरणे विद्युत पुरवठ्याच्या कमी दाबामुळे जळून गेली आहेत. तसेच नळ पाणी योजनेचा विद्युत पंपसुद्धा वीजेच्या कमी दाबाने असल्यामुळे येथील सर्व घरांना पाणी पुरवठा वेळेवर होत नाही.

त्यामुळे आज (सोमवार) रोजी अनाव घाटचेपेड येथील ग्रामस्थांनी सिंधुदुर्गातील महावितरण कंपनीचे असिस्टंट इंजिनियर सूर्यकांत आडीवरेकर यांची भेट घेत निवेदन दिले. यामध्ये आम्हाला नवीन ट्रान्सफॉर्मर कधी देणार असा जाब ग्रामस्थांनी विचारला. यावेळी येत्या दोन दिवसात आपण सर्व्हे करून लवकरच नवीन ट्रान्सफर दिला जाईल असे आडीवरेकर यांनी सांगितले. मात्र, दोन दिवसात कोणतीही कार्यवाही न झाल्यास विद्युत वितरण कंपनीसमोर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

यावेळी ग्रा.प. सदस्या श्रद्धा दळवी, माजी उपसरपंच सुनील पवार, दिलीप पालव, आनंद पवार, गुरुदत्त दळवी, सुरेश पवार, नाना परब, दाजी पालव, रवी पालव, मयूर राणे, सचिन सावंत, प्रसाद सावंत आदी उपस्थित होते.