कागवाड ( प्रतिनिधी ) कागवाडवून उगार शुगरला उसाची वाहतूक केली जाते. या पार्श्वभूमीवर आज एक ट्रॅक्टर ट्रॉली रोडबाळनजीक इंदिरानगरजवळ आला असता ट्रॉली रस्त्याकडेने चालत जाणाऱ्या महिलांच्या अंगावर कोसळल्याने अपघात झाला असून, यात चार महिला ठार झाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने कागवाड पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी कागवाडवून उगार शुगरला उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली रोडबाळनजीक इंदिरानगरजवळ आला असता ट्रॉलीचे मागील चाकाचा हब तुटून बाजूने चालत जाणाऱ्या महिलांच्या अंगावर ट्रॉली कोसळली. त्याखाली सापडून तीन महिला जागीच ठार झाल्या, तर एक महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला आहे.

चंपा लकप्पा तळकट्टी (45), भारती साताप्पा वडराळे (42), मालव्वा रावसाब ऐनापुरे (65) या महिला घटनास्थळी ठार झाल्या, तर उपचारासाठी घेऊन जाताना शेकव्वा नरसाप्पा नरसाई (45) या महिलांचा मृत्यू झाला या सर्व महिला शेडबाळ गावच्या रहिवासी आहेत. अपघात होताच तातडीने जेसीबीच्या साहाय्याने ऊस बाजूला करण्यात आला. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

यातील एक महिला जिवंत असल्याने नजिकच्या रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच या महिलेची प्राणज्योत मावळली. या अपघातामुळे पुन्हा एकदा ऊस वाहतूकीचा प्रश्न तयार झाला असून, नागरिकांत संतापाची लाट आहे.