जात : सांगलीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल पाटील उद्या शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी जतचे माजी आमदार विलास जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देउ नये असे जाहीर मत व्यक्त केले होते. मात्र, त्यांना पक्षाने विश्‍वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर तर केलाच, जत तालुक्यात जगताप यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना ताकद देत त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत विचार करण्यासाठी आज जतमध्ये कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीतच जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राने राजीनामा सादर केला असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्यासाठी व काँग्रेसचे विशाल पाटील यांचा प्रचार करून निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.