कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आज (गुरुवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी गेल्या अनेक दशकांच्या आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले.

खा. संभाजीराजे म्हणाले की, १०५ व्या घटनादुरूस्ती नंतर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून त्यामार्फत मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा अहवाल तयार करून मराठा समाजास आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने असामान्य परिस्थिती सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच इंद्रा साहनी खटल्याप्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासाठी अतिदूर आणि अतिदुर्गम परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे निकष केंद्र सरकारमार्फत अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. ईडब्ल्यूएस  प्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे देशातील अनेक राज्यांतील आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार असल्याचे खा. संभाजीराजे म्हणाले.

यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी पुढील कार्यवाही करण्यासाठी या विषयावर अभ्यास करणार असल्याची माहिती खा. संभाजीराजे छत्रपती यांनी  पत्रकारांशी बोलताना दिली.